थकीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बँकांची जुलूमशाही; ३० डिसेंबरला महागाव तहसीलवर लाल बावट्याखाली तीव्र आंदोलन

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क:

महागाव:- 

 

महागाव तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांकडून थकीत शेतकऱ्यांच्या खात्यांवर निर्बंध लादून शेतीमाल विक्रीतून मिळणारी रक्कम अडवली जात असल्याने शेतकरी अक्षरशः आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या बँकांच्या मनमानीविरोधात Communist Party of India (Marxist)ने आक्रमक भूमिका घेत दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी महागाव तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, हळद व ऊस या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट असताना, तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया (महागाव), युनियन बँक (मुडाणा व महागाव), सेंट्रल बँक (फुलसावंगी व सवना) आणि ग्रामीण बँक (हिवरा) या शाखांकडून हजारो शेतकऱ्यांच्या खात्यांवर निर्बंध लावून विक्रीची रक्कम काढण्यास मज्जाव केला जात आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमेटीने या जुलूमशाहीचा तीव्र निषेध केला आहे. १० ऑक्टोबर २०२५ रोजीची राज्यस्तरीय बँकर्स समिती बैठक, २६ नोव्हेंबर २०२५चा शासन निर्णय आणि २८ नोव्हेंबर २०२५चे समितीचे पत्र—या सर्व निर्देशांनुसार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली स्थगित करून कर्जाचे पुनर्गठन अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र सक्तीची वसुली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पक्षाचे नेते कॉम्रेड डी. बी. नाईक यांनी सांगितले की, थकीत शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम बँकांना अडवता येणार नाही. ती तातडीने विड्रॉलसाठी खुली करावी; अन्यथा ३० डिसेंबरला लाल बावट्याखाली हजारो शेतकरी तहसील कार्यालयावर धडक देतील.तसेच २९ डिसेंबर रोजी तहसीलदारांनी सर्व बँक व्यवस्थापक व आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न निकाली काढावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

रम्यान, पक्षाच्या वतीने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बँक पासबुकसह आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात नुकत्याच दोन दिवसांपूर्वी कॉम्रेड डी. बी. नाईक व देविदास मोहकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले.शेतकरीहिताच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन व बँक व्यवस्थापन कितपत गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या