फुले–शाहू–आंबेडकरांचा जिवंत वारसा : एक चालता-बोलता आधारस्तंभ — प्रा. डॉ. प्रशांत विघे

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव:-
समाजाच्या इतिहासात काही व्यक्ती काळाच्या पुढे चालत असतात. त्या केवळ वर्तमानात जगत नाहीत, तर भूतकाळाचा वारसा पाठीवर घेत भविष्याकडे वाटचाल करतात. समाजपरिवर्तनाच्या या अखंड प्रवासात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार हा केवळ ग्रंथांत बंदिस्त नाही; तो जगण्यासाठीचा संघर्ष आहे, माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे.
हा विचार जो कृतीत उतरवतो, तोच खऱ्या अर्थाने त्या परंपरेचा वारसदार ठरतो. अशाच दुर्मिळ, पण ठाम आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे प्रा. डॉ. प्रशांत विघे.
डॉ. प्रशांत विघे यांचा प्रवास कुठल्याही सत्तेच्या सोपानांनी सजलेला नाही; तो घाम, संघर्ष आणि आत्मसन्मानाने ओलसर झालेला आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा माणूस परिस्थितीचा पराभव मानत नाही; उलट परिस्थितीला प्रश्न विचारत पुढे जातो. ग्रामीण वास्तव, शेतकऱ्याच्या वेदना, शिक्षणातील विषमता आणि सामाजिक अन्याय—या साऱ्यांचा त्यांनी अनुभव घेतला. पण हा अनुभव त्यांच्या हातात शस्त्र बनला, सबब नव्हे.
शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च पातळी गाठताना त्यांनी ज्ञानाला केवळ नोकरीचे साधन बनू दिले नाही; त्यांनी ज्ञानाला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड दिली. त्यामुळेच ते केवळ प्राध्यापक राहिले नाहीत—ते एक विचारप्रवाह झाले. “काम सांगा” ही त्यांची ओळख योगायोगाने तयार झालेली नाही; ती वर्षानुवर्षांच्या प्रामाणिक सेवेतून घडलेली आहे.
समोरचा कोणत्या जातीचा,पक्षाचा किंवा गटाचा आहे.हे, प्रश्न त्यांच्या कामाच्या वाटेत कधीच आले नाहीत. माणूस आणि त्याचा प्रश्न—इतकेच त्यांचे गणित सरळ आणि स्पष्ट.याच भूमिकेचा कळस म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रात झालेली नुटा संघटनेची निवडणूक. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय, केवळ जनाधाराच्या बळावर ते डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्यानंतर प्रचंड मतांनी निवडून आले. ही निवडणूक म्हणजे केवळ पदप्राप्ती नव्हे; ती विश्वासाची पावती होती, चारित्र्याची साक्ष होती आणि कामगिरीवर उमटलेला शिक्का होता.
विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक चळवळीशी नातं जपणाऱ्या या नेतृत्वाने माणसं जोडली—तीही जात-धर्म-वय-पद यांची कुंपणं न उभारता. लहान विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त शिक्षकांपर्यंत सर्वांसाठी ते “आपला माणूस” झाले. “तू कोण आहेस?” हा प्रश्न त्यांनी कधी विचारलाच नाही; तुला काय हवं आहे?” हा प्रश्न मात्र नेहमी अग्रक्रमावर राहिला.त्यामुळेच त्यांचा जनाधार वाढत गेला आणि आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत “प्रशांत विघे” हे नाव ओळखीचं नाही, तर आपुलकीचं आहे.
प्रशासनाशी संवाद साधताना ते कधीही चुकीच्या मार्गाने जात नाहीत; पण योग्य कामासाठी ते ठामपणे उभे राहतात. संयम, शिस्त आणि निर्भीडपणा यांचा हा दुर्मिळ संगम आहे. त्यामुळेच अधिकारी वर्ग त्यांना गंभीरतेने ऐकतो आणि सामान्य माणसाला त्यांच्यात आपला हरवलेला आवाज सापडतो.नेतृत्व म्हणजे आदेश देणे नव्हे, तर जबाबदारी स्वीकारणे—ही भूमिका त्यांनी आपल्या वर्तनातून सतत अधोरेखित केली आहे. तरुणांमध्ये आशा निर्माण करणारे, त्यांना सोबत घेऊन चालणारे आणि नेतृत्व घडवणारे हे व्यक्तिमत्त्व आज शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.
विशेष उल्लेख करावा लागेल तो जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी केलेल्या दीर्घकालीन संघर्षाचा. गेली दहा वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, निवेदनं देणे, चर्चांमध्ये ठाम भूमिका मांडणे—हा संघर्ष त्यांनी कधीही थांबवला नाही. कारण हा प्रश्न केवळ आर्थिक नव्हता; तो माणसाच्या सन्मानाचा आणि न्यायाचा होता.
आज समाजातील तळागाळातला नागरिक असो, शिक्षक असो, कर्मचारी असो किंवा विद्यार्थी—सर्वांसाठी आधार देणारा, कोणताही गाजावाजा न करता मदत करणारा असा हा माणूस आहे. “हा आपला माणूस आहे” ही भावना जाहिरातीतून निर्माण होत नाही; ती काळाच्या कसोटीवर उतरलेल्या प्रामाणिक सेवेतूनच जन्माला येते.
फुले–शाहू–आंबेडकरांचा वारसा म्हणजे माणूस उभा करणे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्याला न्याय मिळवून देणे.
डॉ. प्रशांत विघे हे केवळ त्या वारशाचे अभ्यासक नाहीत—ते त्याचे चालते-बोलते रूप आहेत. म्हणूनच ते केवळ एक व्यक्ती नाहीत; ते समाजासाठी उभा असलेला एक आधारस्तंभ आहेत.
आणि आजच्या अस्थिर काळात समाजाला अशाच आधारस्तंभांची नितांत गरज आहे.
— डॉ. व्ही. पी. कदम
गणित विभाग प्रमुख
गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय, उमरखेड
जिल्हा यवतमाळ.
