महागाव बाजार समितीचा सत्ताकौल आज; भाजपाच्या सभापती गुलाबराव जाधवांविरोधातील अविश्वास ठरावावर निर्णायक मतदान

 

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :

 

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासंघर्ष आज निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, सभापती गुलाबराव लोभा जाधव यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर आज शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या एका मतदानाकडे लागले आहे.

समितीतील एकूण १८ संचालकांपैकी १४ संचालकांनी एकत्र येत दिनांक १५ डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. यावेळी सर्व संचालक थेट यवतमाळ येथील जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयात उपस्थित राहिले होते. यावरून या सत्तासंघर्षाचे गांभीर्य अधोरेखित होते.

हा अविश्वास प्रस्ताव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २३(अ) अन्वये सादर करण्यात आला आहे. प्रस्तावात सभापतींवर संचालकांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेणे, बाजार समितीच्या आर्थिक हिताकडे दुर्लक्ष करणे, व्यापाऱ्यांना लाभदायक ठरणारे निर्णय राबविणे, मासिक सभेत चर्चा न करता परस्पर आदेश काढणे तसेच बहुमताने मंजूर ठरावांची अंमलबजावणी न करणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष सर्वसाधारण सभा बोलावून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज पीठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. हे मतदान गुप्त पद्धतीने की उघड पद्धतीने होणार, याबाबत उत्सुकता असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे सभापती गुलाबराव लोभा जाधव यांना पायउतार व्हावे लागण्याची दाट शक्यता असून, अविश्वास ठराव मंजूर झाल्यास काँग्रेसचे उपसभापती बाळासाहेब करपे यांच्याकडे सभापतीपदाचा प्रभार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 ⬛मतदानातून महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता नेमकी कोणाच्या बाजूने जाते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, हा कौल स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या