यू-डायसविना शाळा,नियमांना हरताळ : महागावात ‘नामांकित’ शाळेचा प्रवेश घोटाळा उघड

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :

 

यू-डायस (U-DISE) क्रमांक नसतानाही चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे सर्रास प्रवेश घेऊन पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल करणाऱ्या महागाव तालुक्यातील एका नामांकित शाळेचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय नियमांना थेट बगल देत सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रवेश प्रक्रियेवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

महागाव केंद्रांतर्गत येत असली तरी सदर शाळेची अधिकृत नोंद महागाव शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, “सदर शाळेने कोणताही अधिकृत संपर्क साधलेला नाही. महागाव केंद्रात तिची नोंद नाही,” असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, शाळा व्यवस्थापन यवतमाळ शिक्षण विभागाकडील पत्र दाखवत असल्याचे समोर आले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल फेरतपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यू-डायस क्रमांकाशिवाय विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे हे शैक्षणिक नियमांचे सरळ उल्लंघन आहे. असे असतानाही संबंधित शाळेने निर्ढावलेपणाने प्रवेश प्रक्रिया राबवली. परिणामी, या शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य थेट धोक्यात आले असून, पालकांची आर्थिक फसवणूक झाल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यू-डायस क्रमांक नसल्यास शाळेला शासकीय मान्यता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी तसेच पुढील शिक्षणाशी संबंधित कोणतीही प्रक्रिया वैध ठरत नाही, हे वास्तव असतानाही खुलेआम प्रवेश सुरू राहिल्याने प्रशासनाच्या नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महागाव तालुक्यात एकूण २०३ शाळांची अधिकृत नोंद असून, त्यांचे यू-डायस क्रमांक शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहेत. मात्र, या शाळेने सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण न करताच भव्य इमारत उभारून चालू शैक्षणिक वर्षात मोठ्या शुल्कासह प्रवेश दिल्याचे समोर आले आहे. अनेक पालकांना या बाबीची माहिती नसल्याने फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे.या,प्रकरणी पालक व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी बेकायदेशीर प्रवेश तात्काळ रद्द करावेत,पालकांकडून घेतलेली रक्कम परत मिळवून द्यावी,तसेच दोषी शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी,अशी ठाम मागणी केली आहे.

 

दरम्यान, प्रकाश मिश्रा, जिल्हा शिक्षणाधिकारी, यांनी यू-डायस नसलेल्या सदर शाळेवर लवकरच कारवाई करण्यात येईल असे भ्रमणध्वनी वरून बोलताना स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग नेमकी कोणती व कितपत कठोर भूमिका घेतो,याकडे आता संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या