डायसशिवाय शाळा चालवण्याचे महागाव तालुक्यात संस्थाचालकाचे व्यवसाय धोरणं !  शासकीय नियमांना बगल देऊन पालकांची सर्रास फसवणूक करणाऱ्या त्या ” नामांकित शाळेवर कार्यवाही कधी होणार ?

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव :- 

यू-डायस (U-DISE) क्रमांक नसतानाही चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या महागाव केंद्रांतर्गत येणाऱ्या एका नामांकित शाळेचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शैक्षणिक नियमांना थेट हरताळ फासून सुरू असलेल्या या प्रकारावर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी,अशी जनभावना आहे.

 

सदर शाळेची महागाव केंद्रात कोणतीही अधिकृत नोंद नसली तरी ती महागाव केंद्रांतर्गत येते.या संदर्भात गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,सदर शाळेने आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही.महागाव केंद्रात तिची नोंद उपलब्ध नाही.मात्र शाळा व्यवस्थापन यवतमाळ शिक्षण विभागातून पत्र आणल्याचे दाखवत आहे. या प्रकरणाची सखोल फेरतपासणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे त्यांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितले.

 

यू-डायस क्रमांक नसताना विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे हे शैक्षणिक नियमांचे सरळ उल्लंघन आहे.असे असतानाही संबंधित शाळेने निर्ढावलेपणाने प्रवेश प्रक्रिया राबवली.परिणामी,या शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य थेट धोक्यात आले असून,पालकांची आर्थिक फसवणूक झाल्याची भावना तीव्र झाली आहे.शैक्षणिक नियमानुसार यू-डायस क्रमांकाशिवाय शाळेला शासकीय मान्यता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी तसेच पुढील शिक्षणाशी संबंधित कोणतीही प्रक्रिया वैध ठरत नाही.तरीही खुलेआम प्रवेश सुरू असल्याने प्रशासनाच्या नियंत्रण आणि कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

या, प्रकरणी पालक व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी मागणी केली आहे की, बेकायदेशीर प्रवेश तात्काळ रद्द करावेत,पालकांकडून घेतलेली रक्कम परत मिळवून द्यावी,तसेच दोषी शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी.आता या गंभीर प्रकारात शिक्षण विभाग ने कणखर भूमिका घ्यावी,अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.महागाव तालुक्यात एकूण २०३ शाळेची अधिकृत नोंद असून त्यांचे यू डायस नंबर सुद्धा महागाव शिक्षण विभागाडे उपलब्ध आहेत.परंतु या नामांकित शाळेने मात्र ह्या सर्व प्रक्रिया नसतांना चालू शैक्षणिक वर्षातशाळेसाठी भव्य इमारत उभारून विद्यार्थ्याचे मोठी शुल्क आकारून प्रवेश मिळविले आहेत. ही बाब अनेक पालकांना ज्ञात नाही.त्यामुळे सदर शाळेविषयी शिक्षण विभाग काय कार्यवाही करणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या