प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभार बदलू नये; अन्यथा आंदोलनाचा इशारा

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव :-
महागाव येथील नगरपंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभार बदलण्याच्या हालचालींवर नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविकेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सदर प्रभार तातडीने काढू नये, अन्यथा लाभार्थ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नगरपंचायत महागावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभार सध्या लिपीक श्री. कुलदिप शेषेराव राजनकर यांच्याकडे असून, त्यांची कार्यपद्धती ही लोकहिताची आणि कर्तव्यदक्ष असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात लाभार्थ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि तत्परता राहिली असल्याचा दावा नगरसेविकेने केला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतील डीपीआर क्रमांक १, २ आणि ३ मधील बहुतांश लाभार्थ्यांनी नातेवाईकांकडून कर्ज, दागिने विक्री तसेच विविध बँकांकडून कर्ज घेऊन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र, अनुदान वितरणात होत असलेल्या विलंबामुळे या लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावल्याचेही निवेदनात नमूद आहे.
अशा परिस्थितीत प्रभारात बदल झाल्यास लाभार्थ्यांचे प्रश्न आणखी वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाने निर्णय बदलल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सौ. जयश्री नरवाडे यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
