उटी गावचा गौरव! पुसदचे फार्मासिस्ट प्रशांत गावंडे यांना महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचा ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’

 

⚫लोकवेध न्युज नेटवर्क 

पुसद : – 

 

जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद (Maharashtra State Pharmacy Council) यांच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फार्मासिस्टांचा सन्मान करण्यात आला. यंदा पुसद येथील जय संतोषी मेडिकल अँड स्टोअर्सचे संचालक तथा सामाजिक कार्यात सक्रिय असलेले फार्मासिस्ट प्रशांत निळकंठराव गावंडे यांची अमरावती विभागातून वैयक्तिक फार्मासिस्ट म्हणून प्रथम क्रमांकाची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागात औषध साक्षरता पोहोचवण्याचे भरीव कार्य,औषधांविषयी जनजागृती,तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांसाठी सातत्याने राबवलेले उपक्रम ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.पर्यावरण, शिक्षण आणि समाजहिताशी संबंधित अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असून, ग्रामीण ते शहरी आणि अतिदुर्गम भागांत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.हा सन्मान सोहळा सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, शेगाव येथे पार पडला. यावेळी सातपुडा एज्युकेशन व सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या अध्यक्षा डॉ.स्वातीताई वाकेकर, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद DIC प्रमुख गणेश बंगळे, यवतमाळ जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नानवाणी, सचिव संजय बुरले, प्राचार्य डॉ.शैलेश भरड आणि DIC अवार्ड को-ऑर्डिनेटर भूषण माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

याआधीही प्रशांत गावंडे यांना राज्याच्या अन्न व औषधी प्रशासनाचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते फार्मा गौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच सलाम मुंबई फाउंडेशन व विविध सेवाभावी संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापूर- सांगलीतील पूरग्रस्तांसाठी सात दिवसांचा सेवा कॅम्प, तसेच स्व. जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उटी यांच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात.या,प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे महागाव तालुक्यातील उटी गावचे सुपुत्र प्रशांत गावंडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत असून,त्यांच्या कार्यामुळे महागाव आणि पुसद परिसराचा मान उंचावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या