जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयात १८ पैकी १४ संचालकांची ठाम हजेरी; महागाव बाजार समितीचे सभापती गुलाब जाधव यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव : – 

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाब लोभा जाधव यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, या प्रक्रियेसाठी समितीतील १८ पैकी तब्बल १४ संचालक थेट यवतमाळ येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयात उपस्थित राहिले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २३(अ) नुसार हा प्रस्ताव अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे.

प्रस्तावात सभापतींवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. सभापती संचालकांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आला असून, बाजार समितीच्या आर्थिक हिताकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांना लाभ होईल अशा निर्णयांची अंमलबजावणी केली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मासिक सभेत चर्चा न करता परस्पर आदेश काढणे, तसेच बहुमताने मंजूर ठरावांची अंमलबजावणी न करणे, अशा बाबी प्रस्तावाच्या कारणांमध्ये स्पष्टपणे नमूद आहेत.

या पार्श्वभूमीवर संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष सर्वसाधारण सभा तातडीने बोलावून अविश्वास प्रस्तावावर निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली आहे. बहुसंख्य संचालक एकवटल्याने बाजार समितीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले असून, महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताकारणाला निर्णायक वळण मिळाले आहे.या अविश्वास प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाची पुढील कार्यवाही काय राहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या