नांदगव्हाण घाटात भीषण अपघात टळला; ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव : –
नागपूर–तुळजापूर महामार्गावरील नांदगव्हाण घाट परिसरात मंगळवार, दि. १४ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास अपघाताची घटना घडली. उतारावर न्यूट्रल अवस्थेत येत असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ट्रकने जोरदार धडक दिली.
या अपघातात ट्रॅक्टर-ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले असून ट्रॉलीतील ऊस महामार्गावर विखुरला गेला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर संबंधित यंत्रणांनी वाहने बाजूला काढून रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत केली.नांदगव्हाण घाटात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
