लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव  : –

महागाव तालुक्यातील मुडाणा गावात मंगळवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन घरे पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, फर्निचर तसेच रोख रक्कम आगीत नष्ट झाली असून संबंधित कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गावातील महावितरणच्या डीपीजवळ शॉर्टसर्किट झाल्याने एका घरात अचानक आग लागली.वाऱ्याच्या झोतामुळे काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील दोन घरांपर्यंत फैलाव केला.गावकऱ्यांनी विहीर व हातपंपाच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र आग आटोक्याबाहेर गेल्याने उमरखेड येथील अग्निशामक दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उमरखेड नगरपरिषदेचे अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुमारे तासाभरात आग नियंत्रणात आणली. दरम्यान महसूल विभागाचे अधिकारी,तलाठी,मंडळ अधिकारी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले.

आगीमुळे बाधित कुटुंबांचे संसार अक्षरशःराखेत बदलले असून उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. महसूल विभागाकडून पंचनामा सुरू असून शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावकऱ्यांनीही तत्काळ मदतीचा हात पुढे करत अन्नधान्य व आवश्यक साहित्य पुरवले आहे.दरम्यान,आगीचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार असून शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

बॉक्स:

भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची तत्परता,आगीच्या घटनेची माहिती मिळताच भुतडा यांनी उमरखेड येथील अग्निशामक दलाच्या वाहनाला घटनास्थळी तत्काळ पाठवले. नितीन भुतडा यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या