बाबासाहेब आम्ही बेईमान झालोत ! आत्मपरीक्षणाची ज्वाला पेटवणारे आंबेडकरी साहित्य (पुस्तक प्रकाशन)

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव : –
भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने १२ डिसेंबर रोजी वाटोद (ता. मानोरा, जि. वाशिम) येथे भदंत महाकाशप यांच्या संयोजनातून एकदिवसीय भव्य धम्मपरिषद उत्साहात पार पडली. या परिषदेचे औचित्य साधून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी-साहित्यिक रामराव कांबळे यांच्या अत्यंत वास्तववादी,अंतर्मुख करणाऱ्या आणि आत्मपरीक्षणाची धार असलेल्या बाबासाहेब आम्ही बेईमान झालोत ! या, पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
धम्मपरिषदेच्या अध्यक्षस्थानी भंते प्रज्ञापाल होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ. हर्षा बोधी महाथेरो (औरंगाबाद) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्रोहाचा ज्वालामुखी म्हणून ओळखले जाणारे पॅंथर नेते दीपकभाई केदार,भिक्खू संघ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा वैचारिक वातावरणात संपन्न झाला.यापूर्वी स्वतंत्र भारताचे गुलाम आणि हत्यारा.. हे ,कविता-संग्रह प्रकाशित करून समाजमनाला अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित करणाऱ्या रामराव कांबळे यांनी या नव्या पुस्तकातून आंबेडकरी चळवळीतील आत्मपरीक्षणाचा आरसा समाजासमोर धरला आहे.युगप्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यात बहुजन समाज कुठे कमी पडतो, याचे प्रखर आणि थेट विश्लेषण या पुस्तकात आढळते, असे मत भदंत डॉ. हर्षा बोधी महाथेरो यांनी व्यक्त केले.बहुजन समाज जर बेईमान झाला नसता, तर भारत केव्हाच जगात अव्वल महासत्ता ठरला असता, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमात कलावंत कुमारी खुशबू अरविंद मिसळे ( ‘मी रमाई’ सादरकर्ती), समता सैनिक दलाचे कमांडर नंदू वानखेडे व त्यांची टीम,सामाजिक कार्यकर्ते नाना भवरे, देवराव हरणे, विजयकुमार कांबळे, रमेश सांगडे, पत्रकार बांधव तसेच असंख्य महिला-पुरुष उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी व संयत संचालन आयुष्यमान संजय कांबळे यांनी केले.धम्मपरिषदेच्या निमित्ताने प्रकाशित झालेले “बाबासाहेब आम्ही बेईमान झालोत ! हे पुस्तक केवळ साहित्यकृती न राहता, आंबेडकरी चळवळीला आत्मपरीक्षण, वैचारिक प्रामाणिकपणा आणि नवसंघर्षाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण वैचारिक दस्तऐवज ठरत असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
