खडका ग्रामपंचायतीचा आरोग्यात मोठा पुढाकार ; नेत्ररोग व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :—
महागाव तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नेत्ररोग,मोतीबिंदू आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सुविधा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन शासकीय कंत्राटदार विजयराव देशमुख, सरपंच प्रतिनिधी अरुणराव देशमुख, उपसरपंच दत्तराव कदम, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन देशमुख, सोसायटी उपाध्यक्ष शंकरराव देशमुख व ग्रामपंचायत अधिकारी गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले.नेत्र तपासणी शिबिरासाठी यवतमाळ येथील सद्गुरु नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. हर्षाल एरकाडे यांनी तब्बल ६० रुग्णांची तपासणी केली. चष्म्याचे नंबर, औषधोपचार आणि पुढील उपचाराविषयी मार्गदर्शनही देण्यात आले. यापैकी १५ रुग्णांमध्ये मोतीबिंदू असल्याचे निदान झाले आहे.पुढील सेवेची सुविधा श्री दत्त क्लिनिक,खडका फाटा येथे उपलब्ध करून देण्यात आली.
दरम्यान, बा.ना. विद्यालयात ॲनिमिया मुक्त भारत उपक्रमांतर्गत ४४ मुलींची हिमोग्लोबिन, उंची व वजन तपासणी करण्यात आली. आरोग्य सेविका आंबेकर ताई व आशा वर्कर आम्रपाली गायकवाड यांनी पोषण, स्वच्छता आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.या,उपक्रमात डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. संदीप शिंदे, डॉ.नंदकिशोर वानखेडे (पीआरओ), विशाल कोबे,अरविंद देशमुख,प्रथमेश देशमुख,शेख अवेज,विलास देशमुख, दशरथ मारटकर, अनिल मते व सोहेल यांनी विशेष सहकार्य केले.या, शिबिरामुळे खडका परिसरातील ग्रामीण नागरिक व विद्यार्थिनींना तात्काळ तपासणी आणि निदानाची सुविधा मिळाली असून,आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या दिशेने हा उपक्रम मोठे पाऊल ठरला आहे.
