उमरखेडमध्ये पुन्हा ‘बस’ची हवा २४ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती ?
⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा बस या निवडणूक चिन्हाची चर्चा जोरात सुरू झाली असून राजकारणातील गेल्या दोन दशकांतील बदल, मतदारांमधील नवीन अपेक्षा आणि जनतेच्या मनात निर्माण झालेली राजकीय चळवळ या तीन घटकांमुळे ही निवडणूक केवळ साधी निवडणूक न राहता ऐतिहासिक स्वरूप धारण करत आहे. या निवडणुकीची तुलना थेट २४ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीशी केली जात आहे, ज्या वेळी बस चिन्हावरून उमरखेडला बाबा जहागीरदार यांच्या रूपाने नगराध्यक्ष मिळाला होता.विशेष म्हणजे त्यावेळी ही,त्यांच्या पॅनलचे सर्वही उमेदवार निवडून येऊन अपक्षांची सत्ता बसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
⬛ जनशक्ती पॅनेलचे ‘बस’ चिन्ह मिळताच राजकारणात खळबळ !
या निवडणुकीत जनशक्ती पॅनेलला बस हे चिन्ह अधिकृतरित्या बहाल झाल्यानंतर निवडणुकीची हवा बदलली आहे. या चिन्हाभोवती निर्माण झालेले प्रतिमान आणि लोकमानसातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. हे चिन्ह फक्त एक निवडणूक प्रतिक नसून, उमरखेडच्या एक ऐतिहासिक काळाचे, प्रभावी कार्यकाळाचे आणि बदल घडवून आणणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते.यामुळेच बस चिन्हाला मिळणारा पाठिंबा, जुन्या समर्थकांची उभी राहणारी एकजूट आणि नव्या मतदारांची उत्सुकता ही निवडणुकीची दिशा ठरवणार आहे. बसचा प्रभाव आजही मतदारसंघात तितकाच टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे.
⬛ सत्तासमीकरणे,ध्रुवीकरण आणि नव्या नेत्यांची परीक्षा
उमरखेडमधील निवडणुकांचे स्वरूप सदैव बहुपक्षीय राहिले आहे. या वेळीही पक्ष, पॅनेल, गटांमधील समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. जनशक्ती पॅनेलचा उदय, प्रस्थापितांचे वर्चस्व, माजींचा प्रभाव, आणि गटबाजीची भूमिका हे,सर्व घटक प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक बुथवर आपली छाप पाडत आहेत.त्यात नगराध्यक्ष पदासाठी सौ. तेजश्री जैन यांची उमेदवारी असल्याने समीकरणे अधिकच बदलताना दिसत आहेत. सुविद्य, संघर्षशील आणि संघटनक्षम नेतृत्व म्हणून ते जनतेसमोर येत आहेत. त्यांच्या उमेदवारीने बस चिन्हाचा प्रभाव अधिक दृढ झाला आहे.
⬛ मतदारांचे समीकरण स्पष्ट ,पर्याय हवा पण बदल निश्चित !
गेल्या काही वर्षांतील नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत मतदारांमध्ये नाराजीची भावना दाटून आली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, शहर नियोजनाचा अभाव,सन २०२२ – २३ या,काळातील घनकचरा व्यवस्थापनामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोपांची मालिका, न्यायालयापर्यंत पोहोचली आहे आणि विकास कामांतील दिरंगाई यामुळे मतदार आज नव्या पर्यायाकडे पाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बस चिन्हाचा वापर हा नव्या राजकीय सुरुवातीचा प्रतीक मानला जात आहे.

