उमरखेड नगराध्यक्ष लढत तापली : किंगमेकरची धावपळ वाढली, तर अंतर्गत किचन कॅबिनेटवर पराभवाची शक्यता?

⚫ ज्ञानेश्वर ठाकरे 

 

 लोकवेध न्यूज नेटवर्क

 

उमरखेड :

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि पुसद नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी चाललेल्या लढतीत हाय व्होल्टेज ड्रामाला शिग आली असून स्वतःला ‘किंगमेकर’ समजणाऱ्या प्रमुख नेत्यावर मतदारांपुढे प्रत्यक्ष लोटांगण घालून मतांची विनंती करण्याची वेळ आली आहे. धनशक्ती आणि जनशक्ती यांच्यातील मुकाबला अधिक तीव्र होत असून या निवडणुकीत त्यांची प्रत्यक्ष कसोटी लागणार आहे.

 

या पार्श्वभूमीवर, पराभव झाला तर त्यामागे किचन कॅबिनेटमधील काही ‘कन्नावार’च जबाबदार ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. लोकसंपर्काऐवजी घरातील निर्णयांवर चालणारी राजकीय रणनीती, गुप्त स्वार्थ आणि बाहेरील दिखावूपूर्ण दमदाटी यामुळे गोट्यात गोंधळ वाढल्याचे संकेत आहेत.

 

दरम्यान, महागाव–उमरखेड विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सात दिवस उमरखेडमध्ये मुक्काम ठोकण्याचे आदेश देण्यात आल्याचा पुरावा ‘लोकवेध न्यूज नेटवर्क’कडे उपलब्ध झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीला किंगमेकरने प्रतिष्ठेची लढत म्हणून घेतल्याचे स्पष्ट होत असून संपूर्ण यंत्रणा उमरखेडमध्ये तंबू ठोकून बसली आहे.उमरखेडची ही निवडणूक स्थानिक राजकारणासाठी ऐतिहासिक ठरणार असून या लढतीत अनेकांचा राजकीय भ्रमाचा भोपळा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.मतदारांचा कल, किंगमेकरची धावपळ आणि अंतर्गत रणनीती याचा एकत्रित परिणाम नगराध्यक्ष पदाच्या अंतिम निकालावर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या