वारशावर संगिताताईंची दमदार इन्ट्री

 

 

दारासिंग रूढीच्या वारशावर सौ.संगी ताईची दमदार एन्ट्री

⚫ज्ञानेश्वर ठाकरे :

लोकवेध न्यूज नेटवर्क 

उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये जनशक्ती पॅनलने जलदगतीने बळकट पकड घेतली असून दारासिंग रुडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. संगिता दारासिंग रूडे आणि माजी नगरसेवक संदीप ठाकरे यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. मागील नेतृत्वाबद्दल जनतेत असंतोष, नाराजी व तक्रारींचा सूर वाढत असताना या दोन्ही उमेदवारांभोवती लाट निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

 

गत वीस वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले दारासिंग रूडे हे स्थानिक राजकारणातील महत्त्वाचे नाव. काँग्रेसमधील त्यांची निष्ठा परिचित असतानाच त्यांनी काही काळ भाजपमध्येही भूमिका निभावली. मात्र विचारधारेतील विसंगतीमुळे त्यांनी पुन्हा ‘घरवापसी’ करत काँग्रेसचा हात धरला. याच सकस राजकीय अनुभवावर सौ. संगिताताई रूडे यांच्या उमेदवारीची पायाभरणी झाली आहे.

 

दरम्यान, प्रभागात पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर टीकेचा झंझावात उठू लागला असून विकासकामांतील विलंब, असमतोल निधीवाटप, दुर्लक्षित प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षांना तडा गेल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार अधिक सजग झाल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर दारासिंग रूडे व संदीप ठाकरे यांच्या उमेदवारीला मजबूत आधार मिळत असून जनशक्ती पॅनलचा प्रचार झपाट्याने विस्तारत आहे.

 

स्थानिक स्तरावर जनशक्ती पॅनलचे आंदोलनात्मक, आक्रमक आणि थेट मुद्द्यावर बोट ठेवणारे राजकारण प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान प्रचारात उमटणारी जनतेची उपस्थिती आणि प्रतिसाद पाहता प्रभागात जनशक्तीचा प्रभाव अधिक स्पष्ट जाणवत आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देण्याआधीच जनशक्ती पॅनलने मैदानात आघाडी घेतली असून प्रतिस्पर्ध्यांच्या तंबूत चिंता वाढली आहे.

 

राजकीय समीकरणे बदलत असताना प्रभाग क्रमांक एकमध्ये जनशक्ती पॅनलने चाललेला प्रचार हा अंतिम टप्प्यातील निर्णायक हल्ला ठरणार की सत्तेतील मोठा उलटफेर? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या