राज्यमंत्र्यांच्या हट्टाने महायुती उधळली; कुटुंबराजकारणावर ॲड. निलय नाईकांचा पत्रकार परिषदेतून थेट प्रहार

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
पुसद:
पुसद नगरपरिषद निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाची महायुती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हट्टामुळे कोलमडल्याचा गंभीर आरोप ॲड. निलय नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपाने विधानसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देऊन विक्रमी मताधिक्य मिळवून दिल्यानंतरही मित्रपक्षांना सहकार्य न करण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले.पुसदमध्ये नगराध्यक्षपदावर एकाच कुटुंबाची मक्तेदारी किती दिवस ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा कुटुंबातीलच उमेदवारी दिल्याने पक्षात लायक उमेदवार नाही की भाजपाला सामोरे जाण्याची हिम्मत नाही,असा अप्रत्यक्ष टोला ॲड.नाईक यांनी लगावला.विकासकामांबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर बेफिकिरीचा आरोप करत
खड्डेमय रस्ते, अतिक्रमण हटावातील अपयश, स्वच्छतेचा बोजवारा, आणि नगरपरिषद शाळांची घसरण यांचा तीव्र उल्लेख केला.जनता आता कुटुंबशाही स्वीकारणार नाही, त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत निश्चित, असा ठाम दावा ॲड. नाईक यांनी व्यक्त केला.
त्यांच्या रोखठोक आरोपानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक कोणते उत्तर देतात? याकडे पुसदकरांचे लक्ष खिळले आहे.
