उमरखेड नगरपरिषद निवडणूक : अखेरच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भव्य शक्ती प्रदर्शन

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड : –
२ डिसेंबर रोजी होणाऱ्या उमरखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशनाचा अखेरचा दिवस असलेल्या १७ नोव्हेंबरला शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून ढोल-ताशे, डफडी, बँड पथक, आदिवासी नृत्य कला, बंजारा महिलांची पारंपरिक वेशभूषा, बुरखाधारी मुस्लिम महिला तसेच मोठ्या संख्येने जमलेले महिला-पुरुष कार्यकर्ते यांच्या जल्लोषात भव्य रॅली काढण्यात आली.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या युतीतर्फे १३ प्रभागातील २६ वॉर्डांमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी भाजप तर्फे निधी नितीन भुतडा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला.
या शक्तिप्रदर्शनात आमदार किसन वानखेडे, माजी आमदार उत्तम इंगळे, प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, नामदेव ससाणे, माजी जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, माजी उपाध्यक्ष नगरपरिषद अरविंद भोयर, नितीन माहेश्वरी यांसह सर्व प्रमुख नेते व हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.शहरात युतीच्या या प्रचंड शक्तिप्रदर्शनाची दिवसभर चर्चाच सुरू होती.
