अवकाळीचा कहर; महागाव–उमरखेड परिसरात वादळी पावसाने जनजीवन ठप्प – वीज कोसळून गोठा जळून खाक!”
लोकवेध न्यूज नेटवर्क / ३१ मार्च
उमरखेड :-
महागाव व उमरखेड परिसरात काल रात्री अवकाळी पावसाने अचानक जोरदार तडाखा देत नागरिकांसह शेतकऱ्यांना हादरवून सोडले. तुफान वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मध्यरात्री पर्यंत मुसळधार पाऊस कोसळल्याने महागाव, शहरासह उमरखेड शहर आणि तालुक्यातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आणि काही काळ शहर अंधारात बुडाले.
या अनपेक्षित हवामान बदलामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना भीती व अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवसांतही अशाच प्रकारच्या अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली असून तापमानात २ ते ३ अंशांनी चढ-उतार होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. आंबा, पपई, टरबूज, केळी यांसारख्या फळपिकांसह काढणीस आलेली ज्वारी, गहू आणि भाजीपाला पिके धोक्यात आली असून वादळी वाऱ्यामुळे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, दहिसावळी येथील शेतकरी बळीराम डोंगरे यांच्या शेतातील गोठ्यावर रात्री वीज कोसळून भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
घटनेनंतर रात्रीपासून पहाटेपर्यंत तालुका प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
अचानक बदललेल्या या हवामानामुळे शेतकरी व नागरिक दोघेही धास्तावले असून प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

