सवना कन्या शाळा शिक्षकाविना,विद्यार्थ्यांचे शिक्षण ‘रामभरोसे’ संतप्त पालकांसह गावापुढार्यांनी विद्यार्थिनींना घेऊन थेट गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षात धडक दिली.

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क / ४ फेब्रुवारी
महागाव :-
सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील शिक्षणव्यवस्था अक्षरशः कोलमडली असून, शाळेत एकही शिक्षिका उपस्थित नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रभारी मुख्याध्यापिकेसह दोन्ही शिक्षिका गैरहजर असल्याने इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थिनींचे शिक्षण ठप्प झाले असून,पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सरोजा वंजारी या गेल्या तीन महिन्यांपासून वैयक्तिक कारणामुळे दीर्घ रजेवर आहेत. आधीच शिक्षकांचा तुटवडा असताना, शाळेतील एक शिक्षिका कार्ला (ता. पुसद) येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आली. उरलेल्या एकमेव शिक्षिकेवर चार वर्गांची जबाबदारी होती. मात्र बुधवारी ती शिक्षिकाही शाळेत अनुपस्थित राहिल्याने शाळेत एकही शिक्षिका नव्हती.
नेहमीप्रमाणे शाळेत आलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनींची मोठी गैरसोय झाली. शिक्षिका नसल्याने काही मुली शाळेच्या आवारात खिचडी शिजविणाऱ्या महिलांच्या आसपास बसून वेळ काढत असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले. ही बाब पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. प्रत्यक्ष शाळेत एकही शिक्षिका नसल्याचे पाहून पालकांचा संताप अनावर झाला.
यानंतर संतप्त पालक व विद्यार्थिनींनी थेट महागाव पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. गटविकास अधिकारी कदम यांच्या दालनात जाऊन प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, सवना ग्रामपंचायतीने २१ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या बैठकीत ठराव मंजूर करून, कन्या शाळेत तातडीने नवीन शिक्षिका प्रतिनियुक्तीवर देण्याची किंवा कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी केली होती.मात्र महागाव गट शिक्षण विभागाने या ठरावाकडे दुर्लक्ष केल्याने आजची परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे सवना येथील कन्या शाळेतील विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.तात्काळ शिक्षिकांची नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.
—————————————————————————————
तब्बल ८३ पट संख्या असलेल्या सवना जिल्हा परिषद शाळेत एकही शिक्षक हजार नाही. या संदर्भात महागाव यांच्यात समितीवर संतप्त पालक आणि सामाजिक कार्यकर्त्याने आज शाळा बंद असल्याने ताटकळत बसलेल्या विद्यार्थिनींना घेऊन धडक देण्यात आली. या संदर्भात केंद्रप्रमुख बाबू खंदारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेध ने संवाद साधला असता ते म्हणाले नियुक्त शिक्षिका अचानक रजेवर गेल्याने हा गोंधळ निर्माण झाला.आम्ही पर्यायी एक शिक्षकाला पाठवले असल्याचे पुढे बोलतांना त्यांनी सांगितले.
