डायलिसिस सुरू असताना आग! उमरखेड आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर; रुग्णांच्या जीवाशी खेळ कोणाच्या भरवशावर?

ज्ञानेश्वर ठाकरे
लोकवेध न्युज नेटवर्क
उमरखेड :
उमरखेड उपजिल्हा रुग्णालय येथील नव्याने सुरू झालेल्या डायलिसिस सेवा केंद्रात काल,सोमवार, दि. २९ रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. डायलिसिस सुरू असताना ही घटना घडल्याने रुग्णांमध्ये एकच घबराट पसरली. सुदैवाने उपस्थित कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत रुग्णांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र,या घटनेने आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आग लागल्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण डायलिसिस कक्ष धुराने भरून गेला होता. दरम्यान उपचार सुरू असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचारी यांची मोठी धावपळ उडाली.जीवितहानी टळली असली तरी ही घटना केवळ नशिबावर निभावल्याचे बोलले जात आहे. जर एखाद्या रुग्णाचा जीव गेला असता, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेतली असती ? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
चार महिन्यांपूर्वीच शासनामार्फत गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा येथे सुरू करण्यात आली. तालुक्यातील अनेक रुग्ण आठवड्यातून दोन वेळा, काही पंधरा दिवसांतून एकदा, तर काही रुग्ण दररोज डायलिसिससाठी येतात. मात्र डायलिसिस सुरू असतानाच वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, हाय व्होल्टेज–लो व्होल्टेजचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या. या गंभीर तक्रारींकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे काल,सोमवारी घडलेल्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. वीजपुरवठ्यातील बिघाड व वाढलेल्या लोडमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले.आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी व नातेवाईकांनी दरवाजे–खिडक्या उघडून रुग्णांची तातडीने सुटका केली. मात्र ही सुटका नियोजनामुळे नव्हे, तर प्रसंगावधानामुळे झाल्याचे चित्र आहे.
या डायलिसिस केंद्राचे संचालन एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (HLL) कंपनीमार्फत केले जाते. रुग्णालयाकडे जनरेटर उपलब्ध असतानाही त्याचा नियमित वापर केला जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्ण व नातेवाईकांनी केला आहे. मात्र या घटनेनंतर जबाबदारी झटकत वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवले जात असून, प्रत्यक्षात आरोग्य विभाग व व्यवस्थापनाने परिस्थिती हलक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. डोंगे यांनी “हाय व लो व्होल्टेजमुळे अडचणी येत असल्याचे सांगत जीवितहानी झाली नसल्यावर समाधान व्यक्त केले.मात्र यामुळे प्रशासनाची जबाबदारी कमी होत नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.या घटनेनंतर उमरखेड आरोग्य विभाग, डायलिसिस केंद्र चालविणारी संस्था आणि वीजपुरवठा यंत्रणा यांच्यातील निष्काळजीपणा उघड झाला असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवण्यासाठी तातडीने ठोस व जबाबदार उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
