महागाव न्यायालयात १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव : –
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षामधील ही चौथी लोकअदालत ठरणार असून तालुक्यातील तडजोडपात्र सर्व प्रकारची दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रलंबित प्रकरणे, तसेच दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतीमुळे वादांचा कायमस्वरूपी निपटारा होऊन पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो. किरकोळ वादांचे गंभीर वादात रूपांतर होण्यापासूनही बचाव होतो. परस्पर सामंजस्यातून न्याय मिळवून देणे, हे लोकअदालतीचे उद्दिष्ट असल्याचे तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) एस. आर. जैन यांनी सांगितले. दि. १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी आपली तडजोडपात्र प्रकरणे नोंदवू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी महागाव न्यायालयात भेट देऊन प्रकरणाची माहिती सहायक अधीक्षक, लिपीक किंवा संबंधित वकिलांकडे नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे मार्गी लागू शकतात, त्यामुळे संबंधितांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन न्यायालयाकडून करण्यात आले आहे.
