नामांकित खासगी शाळेच्या निष्काळजीपणामुळे दहावीचा विद्यार्थी मृत्यूशय्येवर, गंभीर जखमी विद्यार्थ्याच्या पोटात गंभीर इजा शस्त्रक्रिया करून महत्त्वाचा अवयव काढला

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
पुसद येथील जेटस् कीड या नामांकित खाजगी शाळेत शिकत असलेला महागाव तालुक्यातील विद्यार्थी शाळा व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे गंभीर जखमी झाला. या विद्यार्थ्याची तूर्तास मृत्यूशी झुंज सुरू आहे.विद्यार्थ्याचे उपचार व पुढील भवितव्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापणाने नाकारल्यामुळे अन्यायग्रस्त पालकांनी टाहो फोडला असून,शाळा व्यवस्थापणा विरोधात गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी पालकाने पत्रकार परिषदेत केली.
या प्रकरणी सविस्तर असे की, महागाव तालुक्यातील मुडाणा येथील माजी सरपंच तथा प्रगतीशील कास्तकार मनीष खंदारे यांनी त्यांचा पाल्य अमेय यास पुसद येथील नामांकित जेटस् कीड इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश करून दिला होता. अमेय हा इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जेट्स कीड स्कूलमध्ये दि. २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान अतिरिक्त वर्ग (एक्सट्रा क्लासेस ) घेण्यात आले. अमेय मनीष खंदारे हा विद्यार्थी क्लास साठी शाळेत गेला परंतु प्रिन्सिपॉल आणि विषय शिक्षक हजर नसल्यामुळे ऐन वेळी क्लासला सुट्टी देण्यात आली. दरम्यान विद्यार्थी नाईलाजाने वर्गाबाहेर पडले व नेमका येथेच घात झाला. पार्किंगच्या जागी लोखंडी बार वर मुले हाताने झोका घेत असताना काही व्रात्य मित्रांनी हेतूपुरस्सरपणे जोरदार हेलकावा दिल्याने अमेय खंदारे हा हात निसटून पेव्हर ब्लॉक वर कोसळला. या घटनेन त्याच्या पोटात गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेची सूचना विद्यार्थ्याचे वडील मनीष खंदारे यांना देण्यात आली. जखमी अमेय याला डॉ. अमोल मालपाणी यांच्या रुग्णालयात परस्पर भरती करण्यात आले. डॉ. मालपाणी हे जेट्स कीड स्कूलचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी सौ. अस्मिता मालपाणी ह्या सचिव आहेत हे विशेष. जखमी विद्यार्थ्यास भेटण्यासाठी पालक तातडीने दवाखान्यात पोहोचले. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास छाया डायग्नोस्टिक सेंटरला नेऊन सोनोग्राफी व सिटी स्कॅन करण्यात आले. अपघातात अमेय खंदारे याचे प्लिहा ( स्प्लिन) हा पोटातील महत्त्वाचा अवयव फुटला आणि त्याच्या पोटात मोठा रक्तस्त्राव झाल्याने तो अवयव तातडीचे ऑपरेशन करून काढावा लागेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान अमेय खंदारे याचा रक्तदाब खालावल्याने त्याला हार्ट अटॅक आला. जीव वाचविण्यासाठी त्याला तातडीने लाईफ लाईन रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. यात जखमी अमेय चा स्प्लिन पूर्णतः काढून टाकावा लागला. शंभर टाक्यांची ही शस्त्रक्रिया सहा तास चालली. जखमी अमेय चा कसाबसा जीव वाचला.
या शस्त्रक्रियेसाठी पालकांना ९ लाखावर खर्च करावा लागला असून जखमी झालेल्या अमेय जन्मभरासाठी अधू झाला आहे. त्याला दर साल काही इंजेक्शन घेऊनच आता आयुष्य काढावे लागणार असल्याने आई-वडील प्रचंड धास्तावले आहेत. शस्त्रक्रिया आणि एकूणच जोखमीच्या काळात शाळेचे व्यवस्थापक डॉ. अमोल मालपाणी व अस्मिता मालपाणी यांनी विद्यार्थ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि एका पैशाची देखील मदत केली नाही असा आरोप महागाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनिष खंदारे यांनी स्पष्ट केले. जेट्स कीड स्कूल कडे जाणाऱ्या शाळेच्या स्कूल बस मनीष खंदारे यांच्या घरासमोरील रस्त्यावरून धावतात. त्याचा त्रास जखमी झालेल्या अमेय खंदारे यास होत होता. या गाड्या दुसऱ्या रस्त्याने नेण्याची विनंती केली असता डॉ. अमोल मालपाणी यांनी पालक मनीष खंदारे यांचे विरोधात पुसद पोलिसांकडे तक्रार दाखल केली.पालक शाळेच्या गाड्या अडवून दगडफेक करीत असल्याचा खोटा आरोप या तक्रारीत करण्यात आला. शाळा व्यवस्थापनाच्या या मुजोरशाहिला कंटाळून मनीष खंदारे यांनी १६ नोव्हेंबर रोजी पुसद पोलिसांकडे तक्रार दिली परंतु आर्थिक दबावामुळे पोलिसांनी यात कुठलीही कारवाई केली नाही. जेट्स कीड स्कूलचे अध्यक्ष अमोल मालपाणी आणि इतर पाच विद्यार्थ्यांविरोधातगुन्हे दाखल करण्याची तक्रार पोलिसांनी आर्थिक अमिषापोटी धडकवली असा आरोप मनीष खंदारे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
नामांकित शाळेत विद्यार्थ्यांचे आयुष्य डावावर लागल्यामुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र शासनाच्या सीबीएससी पॅटर्न नुसार शाळा चालविली जाते. शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवित्वाची हमी म्हणून विमा काढणे बंधनकारक असताना तो काढण्यात येत नाही व यात दरवर्षी लाखो रुपयांची बचत केली जाते असा आरोप पालकाने केला आहे. याशिवाय या शाळेत आरटीआय कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोपही मनीष खंदारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
_________________________________
विद्यार्थ्यांच्या अपघाताशी शाळेचा संबंध नाही – डॉ.मालपाणी
दिवाळीच्या सुट्टीत हिंदी व संस्कृतचे अतिरिक्त वर्ग घेण्यात येत होते. अमेय खंदारे व इतर पाच विद्यार्थी लघुशंकेसाठी वर्गाबाहेर गेले. तिकडे खेळताना अमेय चा अपघात झाला. यात शाळा व्यवस्थापनाचा संबंध नाही. विद्यार्थ्यांची सोनोग्राफी, सिटीस्कॅन व उपचारादरम्यान अध्यक्ष म्हणून मी स्वतः हजर होतो. उपचाराच्या खर्च मी स्वतः केला. लाईफ लाईन या दवाखान्याचा १ लाख ३७ हजाराचा धनादेश मी स्वतः दिला. पालक अतिरिक्त पैशाची मागणी करून त्रास देत आहेत.
-डॉ. अमोल मालपाणी
अध्यक्ष, जेट्स कीड स्कूल, पुसद
