सुशोभीकरणातील अडथळ्यांवर संघर्ष समितीची पत्रकार परिषदेत टीका; शिवप्रेम बेगडी ? असा सवाल

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड : –
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शिवाजी महाराज चौकातच व्हावा, या न्यायालयीन आदेशानुसार पुतळा उभारला गेला.मात्र मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षात अडथळे निर्माण केल्याचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीकडून करण्यात आला. संघर्ष समितीचे संस्थापक गजानन देशमुख यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्यावर गंभीर आरोप केले.
देशमुख यांनी सांगितले की, पुतळा चौकात उभारण्यासाठी न्यायालयाचा आदेश असूनही विविध निर्णयांमध्ये अडथळे निर्माण केले गेले. समिती मागील आठ वर्षांपासून आंदोलन करत असताना आंदोलनकर्त्यांना समाजकंटक अशी शिवीगाळ केली जाते.शिवप्रेमाबद्दल बोलणाऱ्यांनीच पुतळा प्रक्रियेत अडथळे आणले, हे दुर्दैवी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
समितीच्या मते, पुतळा उभारणीच्या काळात जागासंदर्भात वाद निर्माण करण्यात आला. कालांतराने चौकातील अनधिकृत पेट्रोल पंप हटविण्याच्या मागणीवरून संघर्ष वाढला. प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलनकर्त्यांना अटक झाली, शहर बंदचे आवाहन करण्यात आले आणि नंतर अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. मात्र पेट्रोल पंप मात्र अद्याप कायम असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चौकाचे सुशोभीकरण हे आमचे एकमेव लक्ष्य आहे.आम्ही राजकारण करत नाही. अडथळे येत राहिले तरी संघर्ष सुरू ठेवू, असेही समितीने स्पष्ट केले.पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष अभय पवार,सचिव राहुल मोहितवार, एड. नितीन रुडे, रमेश चव्हाण, प्रविण देशपांडे, गोपाल झाडे आदी उपस्थित होते.
