आचारसंहितेच्या काळात मोठी कारवाई ! बिटरगांव पोलीसांकडून ६ लाखांहून अधिक किमतीची देशी दारू जप्त

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
ढाणकी –
नगरपरिषद निवडणुकीची धामधूम आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना, बिटरगाव पोलीस स्टेशनने मोठी कामगिरी केली आहे. मतदानाच्या अवघ्या तीन दिवस आधी सोईट ते ब्राह्मणगाव रोडवरून लाखो रुपयांची अवैध देशी दारू जप्त करण्यात आली.
या कारवाईत देशी ‘भिंगरी’ दारूचे २७ बॉक्स (किंमत १,०३,६८० रु.), एक वनप्लस मोबाईल (किंमत १५,००० रु.), व टाटा सुमो वाहन (किंमत अंदाजे ५ लाख रु.) असा एकूण ६ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल रवी गीते यांच्या फिर्यादीवरून आरोपी अंकित विनोद जयस्वाल (२७, रा. ढाणकी) व वैभव मुंजाजी हिंगडे (रा. चातारी) यांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम ६५ (ई)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंतामणि, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पांडुरंग शिंदे, बिट जमादार रवी गीते, मोहन चाटे, गोपनीय कर्मचारी प्रकाश मुंढे, राहुल कोकरे, मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, पंजाब सानप यांनी केली.निवडणुकीच्या संवेदनशील काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होत असणे यावरून स्थानिकांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत. आरोपी ही दारू कुठे घेऊन जात होते ? तसेच जप्त बॉटलवरील बॅच क्रमांकाच्या आधारे प्रत्यक्ष लायसन्सधारकावर दारूबंदी विभाग काय कारवाई करणार,असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
