महिलेवर अत्याचार,धमकी आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणात १९ वर्षीय आरोपीला बिटरगाव पोलिसांनी केली अटक

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क
ढाणकी : –

एका महिलेवर वारंवार अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच तिचे अनुचित फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

अटक झालेल्या युवकाचे नाव नितेश प्रकाश मोतेवार (वय १९, रा. करजी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बिटरगाव ठाण्यात अप.क्र. २६५/२५ नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७, ६७(A) तसेच अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांनुसार कठोर कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस पथकाने आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा माग काढून इस्लापूर रेल्वे स्टेशन परिसरातून त्याला ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे, पोउपनि सागर अन्नमवार, पो.हवा. रवि गिते, पोना. मोहन चाटे, पोको. प्रविण जाधव, पोको. इमान शेख आदींचा सहभाग होता. बिटरगाव पोलिसांची पुढील कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या