बिटरगाव पोलिसांची धडक कारवाई : सोईट शेतशिवारातून अवैध देशी दारू साठा जप्त; आरोपी फरार

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
ढाणकी :
बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध दारूविरोधातील मोहिमेअंतर्गत सोमवारी रात्री मोठी कारवाई करत सोईट शेतशिवारातून अवैध देशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या धडक छापेमारीमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२४ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विपीन माधवराव कोथळकर वय. अं ३५, रा. ब्राम्हणगाव, यांचेवर कार्यवाहीचा बडगा उगारला, आरोपी हा त्याच्या सोईट शेतात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा बाळगत असल्याची खातरजमा केल्यानंतर तात्काळ पथकासह पोलिसांनी ठिकाणी छापा मारून सदर कार्यवाही केली.
सदर कार्यवाही दरम्यान आरोपी कोथळकर अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, त्याच्या शेतातील विहिरीजवळ दोन बॉक्समध्ये लपवलेला दारूसाठा पोलिसांना आढळून आला. या बॉक्समध्ये एकूण ९५ देशी दारूच्या ‘भिंगरी संत्रा’ ब्रँडच्या काचेच्या बाटल्या मिळून आल्या. प्रत्येकी बाटलीची किंमत ९० रुपये प्रमाणे एकूण ८,५५० रुपयांचा अवैध साठा पंचासमक्ष जप्त करण्यात आला.या प्रकरणी आरोपी विपीन कोथळकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिटरगाव पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक यवतमाळ आणि उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहा. पोलिस निरीक्षक पांडुरंग शिंदे, पोउपनि सागर अन्नमवार, पोहवा संतोष चव्हाण, पोहवा राहुल कोकरे, पोकों प्रविण जाधव, पोकों सुदर्शन जाधव, पोकों अंबादास गारुळे यांचा सहभाग होता.बिटरगाव पोलिसांच्या या धडक कार्यवाहीमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अवैध्य धंदे करणाऱ्यावर यापुढेही कार्यवाहीचे धाडसत्र राबविले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल, लोकवेध शी बोलतांना सांगितले.
