जातीय सलोखा टिकवणे हा भाजपाचा ध्यास, काँग्रेसने सत्तर वर्षे मतांसाठी भावनांशी खेळ केला ; जमाल सिद्दीकी

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
देशात जातीय सलोखा व सामाजिक एकात्मता अबाधित ठेवणे हा भारतीय जनता पक्षाचा धर्म आहे. भाजपाने नेहमी विकास, राष्ट्रीय हित आणि सर्वसमावेशक कामाचा मार्ग स्वीकारला आहे. तर काँग्रेसने सत्तर वर्षांच्या कारकिर्दीत मुस्लिम समाजाच्या भावना व मतांचा राजकीय फायदा घेतल्याशिवाय काहीच केले नाही,असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी उमरखेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
नाथ नगर येथील नितीनभाऊ भुतडा यांच्या लोटस निवास’ येथे बुधवारी सकाळी ११ वा. ही पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी बोलताना जमाल सिद्दीकी म्हणाले की,भाजप हा आध्यात्म, संविधानिक मूल्ये आणि विकास यांचे संतुलन राखून काम करणारा पक्ष आहे.समाजातील सर्व घटकांना जोडत कार्य करणे हीच भाजपाची परंपरा आहे.
सिद्दीकी यांनी पुढे सांगितले की, देशभरात भाजप शासनाने राबविलेल्या विविध विकास योजनांमुळे सर्व समाजघटकांना समान न्याय व संधी उपलब्ध झाली आहे.भाजपाने नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले असून धार्मिक किंवा जातीय राजकारणामुळे समाजात दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली आहे,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान या संदर्भात अल्पसंख्याकांनी विचारपूर्वक,मतदानाला प्राधान्य द्यावे असे आवाहन देखील केले.
पत्रकार परिषदेत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही प्रकल्प व आगामी उपक्रमांची माहिती दिली.यावेळी रमजान अन्सारी आमदार किसनराव वानखेडे,माजी आमदार नामदेव ससाणे, भाजपचे समन्वयक नितीन भुतडा,इरफान कुंदन, महेश काळेश्वरकर आदींची उपस्थिती होती.
