२० कोटींचा पाऊस, पण उमरखेडचे रस्ते खड्यात! विकासाचा निधी कुठे वाहून गेला ? पालकमंत्री राठोडांचा उमरखेड येथील प्रचार सभेत स्फोटक सवाल

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड –
उमरखेडच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तब्बल २० कोटींचा पाऊस पाडला,मी स्वतः ७ कोटी दिले. तेवढा पैसा देऊनही शहरात रस्ते दिसत नाहीत,उलट रस्त्यांनी खड्यांना जागा दिली मग,हा विकासाचा पैसा नेमका कोणत्या खड्ड्यात गेला ? असा थेट स्फोटक सवाल पालकमंत्री संजय राठोड यांनी उमरखेड येथील शिवसेनेच्या प्रचार सभेत करत शहराच्या प्रशासकीय आणि स्थानिक व्यवस्थापनावर जोरदार टिका केली.
राठोड पुढे बोलतांना म्हणाले.निधी दिला,योजना दिल्या,आदेश दिले,पण विकास मात्र गायब आहे.मग हे ,कसले प्रशासन ? कसली योजना ? शहरात विकास कामे गतीने न चालण्यामागे काहींची नालायकी, ढिसाळ कारभार आणि डोळेझाक स्पष्ट दिसते.अशी परिस्थिती राहिली तर या सर्व विषयावर चौकशी समिती बसवावीच लागेल असा त्यांनी इशाराही दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात ५०० योजना सुरू केल्या. शेतकरी, शेतमजूर, मुली, वयोवृद्ध, सर्वसामान्यांसाठी मदतीचा हात दिला. पण उमरखेडच्या नावावर निधी गेला आणि शहराच्या रस्त्यांवर खड्डे वाढले.हाच विकास आहे का ? शहराने या सगळ्याचा हिशेब मागायलाच हवा असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचारांचे पक्ष आहे. आम्ही लोकांचे काम करतो, काहींच्या खिशाचे नाही. उमरखेडचा विकास थांबवणाऱ्यांना लोकांनी आता आरशात पाहण्याची वेळ आली आल्याचे ते सरते शेवटी म्हणाले.या सभेत जिल्हा संपर्क प्रमुख चिंतागराव कदम, रमेश चव्हाण यांच्यासह शहरातील शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. संजय जाधव यांनी केले तर संचालन राजु गायकवाड यांनी केले. दामोदर इंगोले यांनी आभार मानले. सभेनंतर शहरातून शिवसेनेची दणक्यात मोटार रॅली काढण्यात आली.
