सहा महिन्यांपूर्वीचा दरोडा आणि जबरी चोरीचा गुन्हा उघड ,नांदेड व वडद ब्रम्ही येथून तिघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोन लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची धडाक
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
——————————————
यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत, सहा महिन्यांपूर्वी महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दरोडा व जबरी चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा नुकत्याच चार दिवसांपूर्वी छडा लावला आहे. या कारवाईत नांदेड आणि महागाव तालुक्यातील वडद ब्रम्ही येथून तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ₹२ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महागाव पोलीस स्टेशनअंतर्गत दिवाळीपूर्वी झालेल्या दोन गंभीर गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अंतेश्वर परिसरात सापळा रचला आणि हनुमान सुभाष धनवे (रा. वडद ब्रम्ही, ता. महागाव) याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या विश्वासात येऊन चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्या माहितीनुसार त्याचे साथीदार तुषार ऊर्फ विठ्ठल बाळू भांगे आणि जगदीश गणेश पवार (दोघेही रा. वडद ब्रम्ही) यांनाही पोलिसांनी काही तासांतच अटक केली. या आरोपींकडून रोकड, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
⬛ यशस्वी तपासाची सूत्रधार टीम
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात (म.पो.से.), आणि पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या पथकात स.पो.नि. धीरज बांडे,पो.उ.नि. शरद लोहकरे,पोहवा मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, रविंद्र शिरामे, पो.शि.राजेश जाधव, तसेच सायबर सेल, यवतमाळचे कर्मचारी सहभागी होते.
पोलिस दलाचे कौतुक
या,कारवाईमुळे सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा लागला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागात पोलिसांनी दाखवलेली दक्षता, गुप्त माहितीचे व्यवस्थापन आणि अत्यंत योजनाबद्ध अंमलबजावणी हे या यशामागील मुख्य घटक ठरले आहेत.यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, गुन्हेगार कितीही चलाख असले तरी कायद्याच्या चौकटीतून सुटू
शकत नाहीत.
