ज्येष्ठांच्या सहवासातून मिळाला मानवतेचा अनमोल धडा आनंदाश्रम,टाकळघाट येथे कल्पतरू विशेष शाळेची सदिच्छा भेट

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ जून.

 

बुटीबोरी,नागपूर:-

 

संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा,बुटीबोरी येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी टाकळघाट येथील आनंदाश्रमाला सदिच्छा भेट देत समाजसेवा आणि मानवतेचा प्रेरणादायी संदेश दिला.

 

या भेटीत संस्थेचे सचिव डॉ.राजेश्वर उत्तरवार, ट्रस्टी गौरी उत्तरवार, हिमगौरी देशपांडे तसेच संस्थेचे हितचिंतक उपस्थित होते.यावेळी आनंदाश्रमाच्या कार्याची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या जीवनातील अनुभव आणि भावना जाणून घेण्यात आल्या.

 

आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळ, नागपूर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले आनंदाश्रम हे ज्येष्ठांसाठी,ज्येष्ठांकडून आनंदमय सेवा या ध्येयाने कार्यरत आहे.कान्होलीबारा रोड, टाकळघाट-बुटीबोरी येथे असलेल्या या आश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित निवास, आरोग्यसेवा,भोजन व्यवस्था आणि कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून दिले जाते.

 

भेटीदरम्यान समाजातील गरजू,वंचित आणि ज्येष्ठ घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती घेण्यात आली.ज्येष्ठांच्या सहवासातून जीवनातील अनेक मूल्ये शिकण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

 

या भेटीमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभाव, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची जाणीव अधिक दृढ झाली. समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांप्रती उपस्थितांनी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

 

ही भेट सर्वांसाठी भावनिक,प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा हा संदेश यावेळी उपस्थितांच्या मनावर कायमचा कोरला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या