राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती ३१ मे रोजी महागाव तालुक्यातील विविध गावांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सामाजिक, सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध गावांमध्ये प्रतिमापूजन, अभिवादन, मिरवणुका आणि विचारप्रबोधनाचे कार्यक्रम पार पडले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे झाला. माळवा संस्थानाच्या त्या न्यायप्रिय, दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तब्बल २९ वर्षे आदर्श राज्यकारभार करत जनकल्याणाची अनेक कार्ये केली. काशी, सोमनाथ, उज्जैन, नाशिक, द्वारका यांसह देशातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये मंदिरे, घाट आणि धर्मशाळांची उभारणी करून धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी सतीप्रथेसारख्या अनिष्ट रूढींना विरोध केला. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देत समाजसुधारणेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे त्या आजही लोककल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून स्मरणात आहेत.
जयंतीनिमित्त महागाव तालुक्यातील सवना, दहिसावळी, टेंभी, महागाव, हिवरा, फुलसावंगी, काळी दौलतखान, वाकोडी, मोरथ, धारमोहा आदी गावांमध्ये सर्व समाज बांधवांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वक्त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. त्यांच्या लोककल्याणकारी, न्यायनिष्ठ आणि समाजहिताच्या कार्याचा आदर्श अंगीकारण्याचा संकल्प यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.