देशी दारू दुकानाविरोधात महिलांचा पुन्हा एल्गार महागावात ‘मतदानरूपी बंद’ची पुनरावृत्ती अटळ; उत्पादन शुल्क विभागाची झोप उडाली
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये कै. वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्रालगत व मुख्य बाजारपेठेजवळ सुरू करण्यात आलेल्या देशी दारू दुकान (सीएल–३ क्र. ७९) व बैठक वाईन बारविरोधात महिलांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत असून, या विरोधाला आता जनआंदोलनाचे स्पष्ट स्वरूप येत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. महिलांच्या तक्रारीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी सुरू केली असून, महागावात पुन्हा एकदा ‘मतदानरूपी बंद’ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर महागाव शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील घटना पुन्हा चर्चेत आली आहे. त्या ठिकाणी महिलांनी संघटित होत थेट ‘मतदानरूपी बंद’चा मार्ग अवलंबत दारू दुकानाला जबर धक्का दिला होता. महिलांच्या ठाम भूमिकेमुळे संबंधित दारू दुकान बंद पडले होते.हाच अनुभव लक्षात घेता, प्रभाग क्रमांक १ मध्ये नव्याने सुरू झालेल्या दारू दुकानाविरोधातही अशीच कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत महिलांकडून दिले जात आहेत.
प्रभाग क्रमांक १ मधील महिलांनी सादर केलेल्या निवेदनाची गंभीर दखल घेत अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,यवतमाळ यांनी निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, पुसद यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.दारू दुकान व वाईन बारच्या अनुज्ञप्त्या नियमानुसार आहेत का,याची सखोल तपासणी सुरू असून,मतदारांच्या सह्यांची पडताळणी,प्रत्यक्ष पाहणी तसेच नियमबाह्य बाबी आढळल्यास कठोर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान,या प्रकरणात ‘अर्थपूर्ण मैत्री’च्या आधारे दारू दुकान सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणारे काही चेहरे हळूहळू उघड होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.महिलांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आर्थिक हितसंबंध जपणाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सामाजिक शांतता, सांस्कृतिक वारसा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने महागावातील दारू दुकाने आता गंभीर प्रश्न बनली असून,महिलांचा हा, लढा प्रशासनासाठी पुन्हा एकदा निर्णायक ठरणार का ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

