चिकाटी आणि कष्टांची सुवर्णफळे : मरसुळच्या सुपुत्राची एमपीएससी मधून जिल्हा कृषी अधिकारी (वर्ग १) पदावर दमदार निवड

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १२ फेब्रुवारी
उमरखेड:-
येथून जवळ असलेल्या मरसुळ गावच्या साध्या, संस्कारमय आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या चि. अभिषेक मनोज पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या( एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत थेट जिल्हा कृषी अधिकारी (वर्ग १) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या उज्ज्वल यशाने मरसुळ गावासह संपूर्ण पंचक्रोशीचा अभिमान उंचावला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, मर्यादित साधनसामग्रीतून आणि प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर अभिषेक यांनी हे यश मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासात त्यांनी हार न मानता सातत्याने अभ्यास केला आणि अखेर आपल्या ध्येयाला गवसणी घातली. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची अथक परिश्रमाची तयारी हे महत्त्वाचे घटक ठरले.
विशेष म्हणजे, नवनियुक्त अधिकारी अभिषेक पाटील हे मरसुळ येथील जि.प. शाळेतील माजी विद्यार्थी असून ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. रविकांत दत्तात्रय देशमुख यांचे ते शालेय जीवनातील बॅचमेट मित्र आहेत.
अभिषेक यांच्या निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या मरसुळ येथील निवासस्थानी भेट देऊन सत्कार समारंभ पार पडला. यावेळी दत्तात्रय देशमुख (दै. लोकमत प्रतिनिधी, उमरखेड), जेष्ठ शिक्षक पप्पू पाटील, अभिषेक यांचे आई-वडील व आजी तसेच मित्रमंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिषेक पाटील यांच्या या यशाने मरसुळ गावाचे नाव राज्यभर झळकले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. साध्या कुटुंबातूनही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करता येतात, याचे जिवंत उदाहरण म्हणून आज अभिषेक यांच्याकडे पाहिले जात आहे.
अशा कष्टाळू सुपुत्राला आणि त्यांना घडवणाऱ्या आई-वडिलांना गावकऱ्यांचा मनापासून मुजरा! त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल, लोकवेध न्यूजच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.
