सायकलवर वृत्तपत्र वाटणाऱ्या वडिलांचा मुलगा झाला राजपत्रित अधिकारी; MPSC परीक्षेत यश; जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर गाठली शिखरं

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १२ फेब्रुवारी
उमरखेड : –
सकाळी सायकलवरून शहरातील घरोघरी वृत्तपत्र टाकणाऱ्या वडिलांचा मुलगा आज राजपत्रित अधिकारी झाला आहे. मरसुळ गावचे सुपुत्र अभिजित मनोज पाटील (वय २७) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत थेट राजपत्रित जिल्हा कृषि अधिकारी (वर्ग १) पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे मरसुळसह पंचक्रोशीत अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
अभिजित यांचे वडील मनोज पाटील यांनी अनेक वर्षे ग्रामखेड्यातून शहरात येत सायकलवरून सकाळच्या वेळी नियमितपणे वृत्तपत्र वितरणाचे काम केले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य असतानाही आई-वडिलांनी मुलावर शिक्षणाचे संस्कार केले. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अभिजित यांनी उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवत स्पर्धा परीक्षेत चमकदार कामगिरी केली.
अभिजित हे मरसुळचे मूळ रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, मरसुळ येथे झाले. त्यांच्या नियुक्तीची बातमी समजताच गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या मरसुळ येथील निवासस्थानी ग्रामस्थांनी भेट देत सत्कार व अभिनंदन केले. यावेळी जेष्ठ पत्रकार दत्तात्रय देशमुख, जेष्ठ शिक्षक पप्पू पाटील,आई-वडील, आजी तसेच मित्रमंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकर परदेशी यांनी राबवलेल्या ‘लातूर शैक्षणिक पॅटर्न’अंतर्गत पंचायत स्तरावर जिल्हा परिषद शाळांमध्ये नैदानिक चाचण्या व स्पर्धा परीक्षा उपक्रम सुरू करण्यात आले होते. मरसुळ जिल्हा परिषद शाळेनेही हे धोरण स्वीकारून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी रुजवली. त्याच उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणून अभिजित यांच्यासह त्यांच्या बॅचमधील डॉ. नितीन चवरे, डॉ. रविकांत देशमुख (वैद्यकीय अधिकारी वर्ग १), तसेच अभियंते ज्ञानेश्वर काकडे, प्रियंका देशमुख आणि भाग्यश्री कदम यांनीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अभिजित पाटील यांच्या निवडीमुळे मरसुळ गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. “परिस्थिती कशीही असो, जिद्द आणि शिक्षणाची साथ सोडली नाही तर उंच स्वप्ने पूर्ण होतात. माझ्यासारखे अनेक होतकरू युवक अधिकारी होऊ शकतात,” असा संदेश नवनियुक्त जिल्हा कृषि अधिकारी अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.साध्या कुटुंबातून उभा राहिलेला हा यशस्वी प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आह
