भूमिहीन करून हक्क हिरावले ! प्रशासन झोपेत; न्यायासाठी महागाव तहसीलसमोर आमरण उपोषण 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 महागाव :- 

बौद्ध समाजातील विमल बबन हाडसे व शेतकरी श्रीराम शंकर हाडसे यांना भूमिहीन करून त्यांच्या घटनात्मक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अन्याय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून, ग्रामीण जनतेकडे पाठ फिरवलेल्या प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा आणि अपयशाचा जिवंत पुरावा असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

न्याय मागण्यासाठी वारंवार अर्ज, पाठपुरावा आणि विनवण्या करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याने अखेर सय्यद मुद्दसीर से जलीम यांनी महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.हक्क मागण्यासाठी रस्त्यावर बसावे लागते, ही लोकशाहीची शोकांतिका आहे, असा स्पष्ट आणि आक्रमक संदेश या उपोषणातून देण्यात येत आहे.प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांना शेवटचा मार्ग म्हणून आंदोलनाचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या अन्यायाविरोधात विवेक नरवाडे, रतिश सांगडे आणि दीपक तायवाडे यांनी जाहीर पाठिंबा देत प्रशासनाच्या मनमानी कारभारावर थेट बोट ठेवले आहे.गरीब, शेतकरी आणि बौद्ध समाजातील कुटुंबांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.आज संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, प्रशासन नेमके कुणासाठी काम करते ? असा सवाल ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे.आता चेंडू पूर्णपणे प्रशासनाच्या कोर्टात आहे.तातडीने दखल घेऊन न्याय दिला नाही,तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्याय देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून,जनतेचा संयम संपण्यापूर्वीची काळाची अपरिहार्य गरज बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या