महागावात देशी दारू दुकानाविरोधात पुन्हा पेटले रणशिंग! दहा वर्षांपूर्वीची लढाई पुन्हा उभी ,“आम्ही मारल्यासारखे, तुम्ही रडल्यासारखे” हा ढोंगी खेळ जनतेसमोर उघडा !

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव :-
महागाव शहरात नव्याने सुरू झालेल्या देशी दारू दुकानाविरोधात पुन्हा एकदा तीव्र जनआक्रोश उसळला आहे. दहा वर्षांपूर्वी याच मुद्द्यावर पेटलेल्या ऐतिहासिक आंदोलनाची आठवण ताजी झाली असून, जयश्री संजय नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली देशी दारू दुकान हटविण्यासाठी नवी, अधिक आक्रमक लढाई सुरू झाली आहे.
मात्र या आंदोलनाच्या आडून काही नगरसेवक व पदाधिकारी दुकानमालकाशी अर्थपूर्ण मैत्री साधत केवळ दिखाऊ विरोध करत असल्याचा गंभीर आरोप उघडपणे होत आहे. “आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा” या उक्तीप्रमाणे सुरू असलेला हा सारा बनाव आता शहरवासीयांच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, लोक थेट प्रश्न विचारू लागले आहेत.
शहरवासीयांचा थेट इशारा आहे की, आगामी नगरपंचायत निवडणुकीत अशा दुटप्पी आणि मुखवटाधारी लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवली जाईल. ही प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोकांचा संयम संपत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.दहा वर्षांपूर्वीही महागावात देशी दारू दुकानाविरोधात प्रखर आंदोलन उभे राहिले होते. प्रभाग क्रमांक ८ मधील तत्कालीन नगरसेविका हिना परवेज सुरैया आणि प्रभाग क्रमांक ९ मधील तत्कालीन नगरसेविका छाया गजानन वाघमारे यांच्या पुढाकाराने ते आंदोलन पेटले होते. त्या वेळी उभी बाटली–आडवी बाटली या मतदान प्रक्रियेतून शहरवासीयांनी थेट आपली भूमिका मांडली आणि सदर देशी दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात आंदोलनकर्त्यांना यश आले होते. त्या काळात आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रलोभने, दबाव आणि आमिषे दाखवली गेली; मात्र सदर आंदोलन कर्त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला लढा जिंकून दाखवला होता.
सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशी दारू दुकान मालक म्हणत आहे.“आम्ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करूनच दुकान सुरू केले आहे.पोलीस ठाणेदारही दुकान बंद करण्याचे आदेश देऊ शकत नाहीत. कोणताही अडथळा येणार नाही,” अशी उघड भूमिका ते, मांडत आहेत.यामुळे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.पडद्यामागून अर्थपूर्ण मैत्री करणारे बडे पदाधिकारी आज नवीन सुरू करण्यात आलेल्या देशी दारू सदर दुकान मालकास विनंती आणि गयावया करताना दिसून आले.त्यामुळे याची भूमिका कितपत खरी आहे.ते लोकांनी ओळखले आहे.
या संपूर्ण प्रकरणात शहरात एकच चर्चा आहे.देशी दारू दुकानाविरोधातील आंदोलन कमकुवत करण्यासाठी जे पडद्यामागचे राजकारण सुरू आहे, त्यामागील “झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, हे ओळखण्याची वेळ आली आहे. महागावकरांनी एकदा इतिहास बदलून दाखवला आहे. आता पुन्हा एकदा आंदोलनाची मशाल पेटली असून, यावेळी केवळ दुकानच नाही तर ढोंगी चेहरेही उघडे पडणार, असा ठाम विश्वास शहरवासीय व्यक्त करत आहेत. महागावातील ही लढाई फक्त दारू दुकानाविरोधात नसून ती, जनतेच्या विश्वासघाताविरोधात आहे.
