वेदनेच्या काळात रुग्णांना मायेचा आधार, आपुलकीची साथ आणि माणुसकीची ऊब देणाऱ्या स्नेहांचल वेदना उपशमन केंद्राने आपल्या सेवाभावी वाटचालीची २० वर्षे पूर्ण केली. इंदिरा नगर, मेडिकल चौक, नागपूर येथे १८ ऑगस्ट २०२६ रोजी २० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
दोन दशकांपूर्वी सुरू झालेला स्नेहांचलचा प्रवास आज सेवा, संवेदना आणि माणुसकीचा विश्वासार्ह आधार बनला आहे. या विशेष सोहळ्याला संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची अनोखी झलक सादर केली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर Fusion Band ने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ‘मुकुंदा मुकुंदा’ या गीतावर विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर करत कार्यक्रमात उत्साह आणि आनंदाची रंगत भरली. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
स्नेहांचल वेदना उपशमन केंद्र हे केवळ एक सेवा केंद्र नसून, वेदनेच्या काळात रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मायेचा आधार, विश्वास आणि आपुलकीची सावली ठरले आहे. दोन दशकांच्या या उल्लेखनीय वाटचालीत अनेक सेवाभावी व्यक्ती, सहकारी, हितचिंतक आणि देणगीदारांचे मोलाचे योगदान लाभले.
२० वर्षांचा हा टप्पा साजरा करताना स्नेहांचलशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. २० वर्षे सेवा, २० वर्षे स्नेह आणि २० वर्षे माणुसकी या भावनेतून केंद्राची पुढील वाटचालही अधिक व्यापक आणि संवेदनशील करण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.
“जीवनातील प्रत्येक क्षण समृद्ध करण्यासाठी…” या ध्येयवाक्यासह स्नेहांचलची सेवायात्रा पुढेही अशीच सुरू राहणार आहे.