गुंज एजी फिटरवरील सिंगल फेज बंद; शेतकऱ्यांचा संताप अनावर, किसान मोर्चाचा आंदोलनाचा इशारा

लोकवेध न्यूज नेटवर्क / २३ मार्च
महागाव :-
तालुक्यातील गुंज येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवना काळी (दौ) गुंज एजी फिटरवरील सिंगल फेज वीजपुरवठा मागील पंधरा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खडका येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हा पुरवठा अत्यंत विस्कळीत असून वारंवार ब्रेकडाऊनच्या कारणावरून तासन्तास वीज खंडित ठेवली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
वीज वितरण कंपनीकडून सौर प्रकल्पातून वीज मिळत असल्यामुळे एजी फिटरवरील सिंगल फेज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सौर प्रकल्पही सुरळीत चालत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. यामुळे शेतीकाम, पिकांची निगा आणि जनावरांची देखभाल यावर गंभीर परिणाम होत आहे.
शेतशिवारात रात्र काढणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या अंधारातच काम करावे लागत असून परिसरात बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांचा वावर वाढल्याने जीवितासही धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने शेतकरी अधिकच भयभीत झाले आहेत.
आमच्या हक्काची वीज भांडवलदारांना पुरवली जात आहे, तर शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतीही एक उद्योग असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा वीजपुरवठा मिळालाच पाहिजे.असा संतप्त सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सवना काळी (दौ) गुंज एजी फिटरवरील बंद असलेला सिंगल फेज तात्काळ सुरू करावा, अन्यथा राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात महागाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, शेतकरी नेते पंजाबराव खडकेकर,भिमराव गोरे,गजानन पायघन, मदन जाधव, प्रमोद पवार, सचिन गोरे, नितीन चिपडे,बाळू राठोड, लक्ष्मण गोरे, शिवाजी लाहबर,गुलाब मते, नागेश दळवे, सेवादास जाधव, गोलू गोरे, समर्थ पुंड, शुभम पायघन, श्रीकांत लहाबर, आनंदा शिंदे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित होते.
