संपर्क

तहानलेल्या प्रवाशांना दिलासा; महामानवाच्या जयंतीनिमित्त महागावात ‘स्मृती पाणपोई’चे लोकार्पण लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महागाव येथे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.स्व. कु.श्रावणी निलेश नरवाडे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी व नागरिकांसाठी ‘पाणपोई’चे लोकार्पण मंगळवार,१४ एप्रिल रोजी करण्यात आले. महागाव बस स्थानक परिसरातील वाढती वर्दळ लक्षात घेता,शुभम सर्विसिंग सेंटरजवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथे ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे.रणरणत्या उन्हात प्रवाशांची तहान भागविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, ‘पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे’ या तत्त्वाची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून दिलेला समानतेचा संदेश या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला आहे.शिक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत,विजय खंदारे यांच्या सौजन्याने ही पाणपोई उभारण्यात आली.“माणुसकीच्या नात्याने केलेले छोटेसे कार्यही समाजासाठी मोठा संदेश देऊन जाते,असा भाव यावेळी व्यक्त करण्यात आला.या पाणपोईचे उद्घाटन भाजप समन्वयक नितीन भुतडा व आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे, ठाणेदार धनराज निळे, प्राचार्य शरदचंद्र डोंगरे, जेष्ठ पत्रकार गजानन वाघमारे, संजय भगत, महागाव पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, ज्ञानेश्वर ठाकरे, निलेश नरवाडे यांच्यासह अनेक पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती. स्व. श्रावणीच्या स्मृती जपत उभारलेली ही ‘पाणपोई’ आता महागावातील प्रवाशांसाठी दिलासा ठरत, समाजसेवेचा जिवंत संदेश देत राहणार आहे.

लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महागाव येथे

ताज्या बातम्या